उत्सव

श्री क्षेत्र थेऊर येथील यात्रा उत्सव

भाद्रपद द्वारयात्रा

श्रीक्षेत्र मोरगावप्रमाणेच श्रीक्षेत्र थेऊर येथून भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी या चार दिवसात द्वारयात्रा निघते. थेऊर येथील चार द्वारयात्रा पिरंगुटकर देव कुटुंबीय भाद्रपद महिन्यात प्रतिपदा ते चतुर्थी करतात व त्याच प्रमाणे श्रीकाका महाराज प्राप्त श्री चिंतामणींचा तांदळा घेऊन हिंजवडीकर, उरुळीकर, जांबेकर देव कुटुंबीय येतात व चौथे द्वार यात्रेस थेऊर येथील श्रीचिंतामणी यांची भोगमूर्ती पालखीतून श्री महातारी देवीचे देवळापर्यंत नेली जाते. शुध्द प्रतिपदेला स्नान नित्यपूजा करून भगवान श्रीचिंतामणीच्या पूजनाने द्वार यात्रा करणारी मंडळी वाजत-गाजत प्रस्थान करतात.

सर्वप्रथम मुळा-मुठेच्या किनाऱ्यावर असणाऱ्या महासाधू श्रीमोरया गोसावी महाराजांचे तपस्या स्थान असणाऱ्या व्याघ्रशिळेजवळ सर्वजण पोहोचतात. याला “मोरया गोसावी महाराजांचे आसन” असेही म्हणतात. त्या पावन स्थानाचे पूजन केल्यानंतर पहिले द्वार म्हणून कोरेगाव येथे असणाऱ्या आसराई देवीचे पूजन केले जाते. तेथे परंपरेप्रमाणे पूजाअर्चा, पद अष्टक गायन, प्रसाद इत्यादि गोष्टी संपन्न होतात. त्यानंतर पुन्हा यात्रेकरू मंडळी श्रीक्षेत्रावर परततात. दुसऱ्या दिवशी म्हातोबा आळंदी नावाच्या गांवात असणाऱ्या ओझराई देवीची पूजा केली जाते.

चतुर्थीच्या दिवशी द्वारयात्रेसोबत पालखी असते. थेऊर गावचे ग्रामदैवत असणाऱ्या बाभूळ वनातील श्री महातारी देवीच्या जवळ या चौथ्या दिवशीची पूजा संपन्न होते. या संपूर्ण कार्यकाळात श्री मोरया गोसावी महाराजांच्या परंपरेतील विविध पदांचे गायन करीत, विविध गजर करीत यात्रेकरू मंडळी ही यात्रा संपन्न करतात. चतुर्थीची यात्रा ग्रामदैवतापाशी असल्याने सर्वत्र रांगोळ्या रेखाटल्या जातात. फटाके उडवले जातात. पालखी प्रथम विसावा नावाच्या ठिकाणी विसावते. शेवटी मंदिरात पोहचते. रात्री पिरंगुटकर देव व हिंजवडीकर देव यांचेतर्फे श्री चिंतामणी यांची महापूजा होते व नैवेद्य दाखवला जातो.

प्रत्येक विनायकी चतुर्थीला होणारा छबिना अर्थात मोरयाची पालखी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला रात्री अकरा-साडेअकरा वाजता संपन्न होते. त्यावेळी मोरयाला संपूर्ण पोशाख केला जातो. रात्री दोन वाजता पिरंगुटकर देव मंडळी व हिंजवडीकर देव मंडळी श्रीमोरया गोसावी महाराजांच्या परंपरेतील एकवीस पदांचे साग्रसंगीत सादरीकरण करतात. शेवटचे पद सादर होईपर्यंत सकाळचे सुमारे सहा वाजलेले असतात. त्यानंतर गुलाल उधळून टिपऱ्यांचा खेळ केला जातो.

तोवर भाद्रपद शुद्ध पंचमी लागलेली असते. त्या वेळी परंपरेप्रमाणे श्रीचिंतामणींना मटकीच्या उसळीचा नैवेद्य दाखवला जातो. पंचमीस हिंजवडीकर देव कुटुंबियांतर्फे महाप्रसादाचे आयोजन केले जाते. हाच प्रसाद स्वीकारून सर्व यात्रेकरू चार दिवस व चतुर्थी उपवासाचे पारणे करतात. श्री मोरया गोसावी महाराज ह्यांनी आपल्या पदामध्ये म्हटल्याप्रमाणे जे भक्त ह्या चारही द्वारांची यात्रा करतात त्यांची अभिलाषा, मनाची इच्छा पूर्ण होते असे मानले जाते.

पहिला दिवस: पूर्वेकडे- ओझराई देवी कोरेगाव मूळ ८ कि. मी. येथे
दुसरा दिवस: दक्षिणेकडे- वनराई आळंदी म्हातोबाची ७ कि. मी.
तिसरा दिवस: पश्चिमेकडे- मांजराई मांजरी बु. ७ कि. मी.
चौथा दिवस: उत्तरेकडे- महातारी आई (थेऊर) १ कि. मी.

माघी यात्रेचे वैभव

          देव घराण्यातील पिरंगुटकर देव कुटुंबीय हे त्यांच्या पूजेतील सुंदर दशहस्ती मूर्ती घेऊन माघ शुद्ध चतुर्थीस श्रीक्षेत्र थेऊर येथे येतात.  त्यांची व श्रीचिंतामणी यांची भेट होते त्याचप्रमाणे श्रीकाका महाराज प्राप्त श्रीचिंतामणीचा तांदळा घेऊन हिंजवडीकर, उरुळीकर, जांबेकर देव कुटुंबीय माघ शुध्द तृतीयेला श्रीक्षेत्र थेऊर येथे येतात, चतुर्थीस दुपारी अभिषेक व महानैवेद्य होतो व रात्री पिरंगुटकर देव यांची दशहस्ती मूर्ती व श्रीकाका महाराज प्राप्त तांदळा मूर्ती ह्या श्री चिंतामणी समोर विराजमान होतात आणि २१ पदांची धुपारती होते. पंचमीस पहाटे ह्या नयनरम्य चतुर्थी उत्सवाची सांगता करण्यात येते व पिरंगुटकर देव कुटुंबीय पुन्हा आपल्या गावी जातात. पंचमीस हिंजवडीकर देव कुटुंबियांतर्फे महाप्रसादाचे आयोजन केले जाते व यात्रेची सांगता होते.

          श्रीक्षेत्र मोरगाव येथे माघ शुद्ध पंचमीचा उत्सव संपवून भगवान श्रीमंगलमूर्तीची स्वारी माघ शुद्ध अष्टमीला श्रीक्षेत्र थेऊर येथे येते. महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज  स्वतः मोरयाला पोटाशी बांधून एकटेच प्रवास करीत. पुढे श्रीचिंतामणी महाराजांनी सर्व भक्तमंडळींसह ही यात्रा सुरू केली. काही काळापूर्वी भगवान श्री मंगलमूर्तीचा विग्रह घोड्यावरून वाजत- गाजत आणला जायचा. आता श्री चिंचवड देवस्थान ट्रस्ट तर्फे मोरयाला रथातून आणले जाते. 

          माघ शुद्ध अष्टमीला श्री मंगलमूर्तीचे आगमन झाल्यानंतर गावाच्या वेशीपाशी वाजत-गाजत त्यांचे श्रीचिंतामणी मंदिरात आगमन होते. त्या दिवशी भगवान श्रीचिंतामणींना संपूर्ण पोषाख केला जातो. रात्री अकरा वाजता धुपारती सुरू होते. महासाधू श्रीमोरया गोसावी महाराजांच्या परंपरेतील विविध पदांचे गायन करीत ही धुपारती रात्री दोन अडीच वाजता संपन्न होते. त्या रात्री वेगळी शेजारती केली जात नाही. दुसऱ्या दिवशी अर्थात भाद्रपद शुद्ध नवमीला श्रीचिंचवडकर देव महाराज यांच्याद्वारे भगवान श्रीमंगलमूर्तीसह श्रीचिंतामणींची महापूजा केली जाते. दुपारी सभामंडपात महाप्रसादाचे आयोजन केले जाते. त्यानंतर विडा समर्पित केला जातो. अशाप्रकारे माघी यात्रा संपन्न होऊन चार वाजता भगवान श्रीमंगलमूर्तींची स्वारी सिद्धटेककडे रवाना होते.

इतर वार्षिक कार्यक्रम

          श्रीक्षेत्र थेऊर येथे दसरा, दिवाळी, पाडवा, संक्रांत अशा विविध एकूण बारा सणांचे विशेष आयोजन केले जाते. या प्रसंगी श्रीचिंतामणींना महापूजा झाल्यानंतर पेशवेकालीन दागदागिने आणि महावस्त्राने सुशोभित केले जाते. भाद्रपद शुद्ध पौर्णिमेला श्रीगणेशयागाचे आयोजन केले जाते. देव दीपावलीच्या दिवशी सुद्धा श्रीचिंतामणींची विशेष पूजा बांधली जाते. कार्तिक वद्य अष्टमीला श्रीचिंचवड देवस्थान ट्रस्ट तर्फे श्रीरमा-माधव स्मृतिदिन रूपात श्रीमंत माधवराव पेशवे आणि महासती रमाबाईंच्या स्मृतीला अभिवादन केले जाते. अशा पद्धतीने श्रीक्षेत्र थेऊर येथे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दर संकष्टी व विनायकी चतुर्थीला छबिना निघतो. दरवर्षी प्रत्येक सणाला श्रीचिंतामणीला पोषाख करून आरास केली जाते.

theur-leave-img-divider
मराठी english