परंपरा

श्री क्षेत्र थेऊर येथील परंपरा

श्री विनायक उर्फ काका महाराज देव व श्री चिंतामणींचा तांदळा

          श्रीचिंतामणी महाराज यांना चार पुत्र झाले. त्याप्रमाणे जेष्ठ पुत्र श्रीनारायण महाराज हे श्रीमोरया गोसावी महाराज प्राप्त श्रीमंगलमूर्तीची पूजा करीत असत. श्रीकाका महाराज यांना देखील आपण श्रीमंगलमूर्तीची पूजा करावी असे वाटत असे, एकदा श्रीकाका महाराज श्रीमंगलमुर्तींना दुर्वा वाहण्यास गेले असता श्रीनारायण महाराज यांनी त्यांना विरोध केला व त्याचा श्रीकाका महाराज यांना राग आला व त्यांनी पण केला की, “दुसरा मंगलमुर्ती मिळवेन तेव्हाच चिंचवडात पाऊल ठेवेन” असे म्हणून ते थेट मोरगावला गेले व श्रीमयुरेश्वराची आराधना करू लागले.  श्रीकाका महाराज यांची भक्ती पाहून श्रीमयुरेश्वराने दृष्टांत दिला की, “मी या आधी तुझ्या घराण्यात श्रीमंगलमूर्ती रूपाने अवतरलो आहे तरी आता तू श्रीक्षेत्र थेऊर येथे जाऊन तपश्चर्या कर.” 

          त्याप्रमाणे श्रीकाका महाराज यांनी श्रीक्षेत्र थेऊर येथे जाऊन २१ दिवस नदीत उभे राहून उग्र तपश्चर्या केली. माशांनी शरीराचे लचके तोडले तरी देखील विचलित न होता तपश्चर्या चालू ठेवली.  शेवटी श्रीचिंतामणी प्रसन्न झाले व तांदळारुपात श्रीकाका महाराज यांना प्राप्त झाले. त्याच वेळी जिंजीला छत्रपती राजाराम महाराज यांना दृष्टांत झाला की, “मी अवतरलो आहे माझी व्यवस्था करा”. त्याप्रमाणे  श्रीकाका महाराज यांना थेऊर, जांबे, उरुळी, हिंजवडी ही गावे इनाम करून देण्यात आली. श्रीकाका महाराज मोठ्या इतमामात चिंचवडला आले. श्री नारायण महाराज यांनी त्यांना स्वतंत्र वाडा बांधून दिला व तेव्हा पासून भाद्रपद व माघ महिन्यात श्री चिंतामणीचा तांदळा घेऊन श्री काका महाराज यांचे वंशज यात्रेसाठी थेऊर येथे जाऊ लागले. सदर चिंतामणींचा तांदळा श्रीक्षेत्र चिंचवड येथे विराजमान आहे.

श्री पिरंगुटकर देव कुटुंबीय व श्री प्रति चिंतामणी

          महासाधू श्री मोरया गोसावी ह्यांचे नातू, श्रीचिंतामणी महाराज ह्यांचे पुत्र व श्री नारायण महाराज ह्यांचे वंशज देव कुंटुंबीय थेऊर येथे स्थायिक होते व श्रीचिंतामणी चरणी सेवा करीत होते. श्रीमंत माधवराव पेशवे हे आपल्या प्रकृती अस्वास्थामुळे अंतसमयीपूर्व थेऊर येथे स्थायिक होवून श्रीचिंतामणीची आराधना करु लागले व तेथूनच कारभार करु लागले. देव कुटुंबीयांचा श्रीचिंतामणी सेवेचा नित्यक्रम, टाळ गजरातील धूपार्ती ह्या सर्वांमुळे श्रीमंताना हवा तेवढा वेळ श्रीचिंतामणी चरणी मिळेनासा झाला व म्हणून श्रीमंत माधवराव पेशवे ह्यांनी देव कुटुंबीयांना विनंती केली की पुण्याजवळ मावळ भागात पिरंगुट गावात स्वयंभू प्रति चिंतामणी असून आपण तेथे स्थायिक व्हावे. 

          आपल्या लाडक्या पेशव्यांच्या विनंती वरून देव कुटुंबीय थेऊर येथून पिरंगुट येथे स्थायिक झाले. व अशा रितिने श्रीनारायण महाराज ह्यांच्या वंशातील एक शाखा पिरंगुट येथे स्थायिक झाली. व पुढे ह्या देव कुटुंबीयांना “पिरंगुटकर देव कुटुंबीय” असे संबोधले जाऊ लागले. श्रीमंतांनी देवांना पिरंगुट येथे हेमाडपंथी मंदिर उभारून दिले व आसपासच्या ३६ गावांचा महसूल देखील कुटुंबीयांना चरितार्थासाठी दिला. तेव्हापासून आजपर्यंत पिरंगुटकर देव कुटुंबीय पिरंगुट येथे श्री प्रति चिंतामणी चरणी सेवा करु लागले व ती आजही सुरू आहे. पण थेऊर येथील चिंतामणीची ओढ म्हणून आजही पिरंगुटकर देव कुटुंबीय व श्री गणपती देवस्थान पिरंगुट दर वर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी उत्सव (प्रतिपदा ते सप्तमी) तसेच माघ महिन्यातील चतुर्थी उत्सव मोठ्या भक्तीभावाने थेऊर येथे चिंतामणी चरणी स्थायिक होवून करतात.

theur-leave-img-divider
मराठी english