ब्रह्मा सृष्ट्यादिसक्तः स्थिरमतिरहितः पीडितो विघ्नसंघैः ।
आक्रान्तो भूतिरक्तः कृतिगुणरजसा जीवितं त्यक्तुमिच्छन् ।।
स्वात्मानं सख्यभक्त्या गणपतिममलं सेव्य चिंतामणि यम् ।
मुक्तश्चास्थापयत्तं स्थिरमतिसुखदं स्थावरे ढुंढिमीडे ।।
“(भगवान गणेशांचे स्मरण न करता) रजोगुणाच्या चंचलतापूर्ण कृतिशीलतेमुळे, सृष्टि निर्मितीच्या कार्यात व्यस्त झालेले ब्रह्मदेव अनेक विघ्नांद्वारे पीडिल्या गेल्यामुळे जीव देण्याची (हाती घेतलेले हे काम सोडून देण्याची) इच्छा करते झाले. (त्या वेळी आपल्याकडून घडलेल्या प्रमादाची जाणीव झाल्यामुळे) सख्यभक्तीद्वारे आपले आराध्य असणाऱ्या, सर्व गुणांच्या पार असणाऱ्या, चित्तप्रकाशक अशा चिंतामणीच्या उपासनेने चिंतामुक्त झाले. (त्या भगवान ब्रह्मदेवांनी) स्थावरक्षेत्री स्थापन केलेल्या, स्थिरबुद्धीचे सुख प्रदान करणाऱ्या श्रीचिंतामणींचे मी स्तवन करतो.”सृष्टिरचनेच्या कार्याला प्रारंभ करताना भगवान ब्रह्मदेव श्रीगणेशपूजन करण्याचे विसरले. हे विश्व निर्माण करण्याची बुद्धि स्वतःजवळ आहे. या विश्वाच्या निर्मितीची क्षमतारूपी सिद्धि स्वतःजवळ आहे, असा अहंकार त्यांना झाला होता.
आपण आपल्या शक्तीने वाटेल ते करू शकतो, या अहंकारात गढून गेल्याने स्वतःला मिळालेली शक्ति ही भगवंताची कृपा वाटण्याऐवजी ती आपली वैभवशाली पात्रता त्यांना वाटू लागली. त्यांचा हा अहंकार दूर करण्यासाठी भगवान गणेशांनी अपूर्व लीला केली.
भगवान ब्रह्मदेव ज्या-ज्या प्रकारचा विचार करत होते, त्यापेक्षा वेगळीच सृष्टी निर्माण होऊ लागली. त्यांनी दोन पायांचा विचार केला तर चार पाय असणारे जीव तयार होऊ लागले. एका मस्तकाचा विचार केला तर चार-पाच मस्तकांचे जीव तयार होऊ लागले. पुढे पुढे तर ते स्वतःच तयार होऊ लागले. अत्यंत अकल्पनीय जीव प्रकट होऊ लागले. कोणाला अनेक डोळे, तर कोणाला डोळेच नव्हते. कोणाला अगणित हात-पाय तर कोणी हातपायाशिवाय. श्रीब्रह्मदेव गोंधळून गेले. हे असे का होत आहे हेच त्यांना समजेना. आपण विचार करतो त्यापेक्षा वेगळी किंवा आपण विचारही करत नाही अशी सृष्टी कशी काय तयार होते आहे? या प्रश्नाने ते भांबावून गेले.
हे संकट तेवढ्यावरच थांबले नाही. आता या सगळ्या जीवांनी भगवान ब्रह्मदेवांना त्रास द्यायला सुरुवात केली. मग मात्र भगवान ब्रह्मदेवांना जीव नकोसा झाला. या सगळ्यावर काय मार्ग काढावा ते त्यांना कळेना. अन्य समयी आपल्या चार मस्तकांनी चारही दिशांना पाहणारे अर्थात सर्वत्र पाहू शकणारे म्हणजेच सर्वज्ञ असे भगवान ब्रह्मदेव या समयी मात्र केवळ अज्ञ ठरले. चार पैकी एकही मस्तक काम करेना. हे का घडत आहे ते कळेना. यातून मार्ग कसा काढायचा ते ही कळेना. भगवान ब्रह्मदेवांच्या समोर संपूर्ण अंधार पसरला. ‘मी या सगळ्यांचे निर्माता, मीच विश्वजनक, माझीच सत्ता अपरंपार, माझ्या शक्तीवर इतरांची शक्ति अवलंबून, मीच सर्वश्रेष्ठ’ या आत्तापर्यंतच्या प्रत्येक भावनेला समोर उद्भवलेल्या प्रत्येक संकटाने छिन्नविच्छिन्न करून टाकले. अहंकाराचा पार चुराडा झाला. अहंकार गेला अन् त्यासोबत ताठा गेला. नम्रता आली. शरणागती आली.
या सर्व विघ्नांपासून सुटका करून घ्यायची तर श्रीविघ्नेश्वराला शरण जाण्याशिवाय पर्याय नाही याची जाणीव झाली आणि भगवान श्रीब्रह्मदेव आर्त स्वरात भगवान गणेशांची करुणा भाकू लागले. अहंकार गळून पडला की भगवान नित्यप्राप्तच असतो. भगवान श्रीब्रह्मदेवांच्या मनातील चिंता दूर करण्यासाठी भगवान श्रीचिंतामणी रुपात प्रकट झाले. भगवान ब्रह्मदेवांच्या मनांतील अहंकाराचे मळभ दूर झाले. भगवान श्रीगणेश यांच्या कृपेने, या सर्व समस्यांमधून निर्माण झालेली चित्ताची अस्थिरता दूर झाली. अहंकार आणि ममत्व यांच्या मुळेच चित्त अस्थिर होते. भगवान श्रीगणेशाचे दर्शन झाल्यावर श्रीकृपेने हे सर्व विकार दूर झाले. ज्या तपोभूमीमध्ये भगवान ब्रह्मदेवांच्या चित्ताला स्थिरता प्राप्त झाली, स्थावरता लाभली, त्या क्षेत्राला ब्रह्मदेवांनी “स्थावर क्षेत्र” असे नाव दिले. कालांतराने शब्दबदल होत आज आपण या क्षेत्राला “थेऊर” या नांवाने ओळखतो. भगवान ब्रह्मदेवांनी चित्त स्थावर करणाऱ्या या क्षेत्रावर चित्ताला स्थिरता प्रदान करणाऱ्या श्रीचिंतामणीची स्थापना केली. भक्तांच्या सकल चिंता दूर करण्यासाठी श्रीचिंतामणी आजही येथे विराजमान आहेत.
© 2024 Chinchwad Deosthan Trust : Theur. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper