चिंचवडचे सत्पुरुष व श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराजांचे सुपुत्र श्रीचिंतामणि महाराज देव यांनी सुमारें ४०,००० रु. खर्चून हे श्रीमंदिर बांधले. श्रीनारायण महाराज देव तथा श्रीधरणीधर महाराज देव यांच्या काळात या वैभवात भर घालण्यात आली. त्यानंतर थोरले माधवराव पेशवे यांनी देवालयाचा सागवानी लाकडाचा घडवलेला भव्य सभामंडप श्रीचरणी समर्पित केला व देवळाचा विस्तार वाढविला. त्यानंतर हरीपंत फडके यांनी व इतर अनेक भक्तांनी या देवालयांची शोभा व भव्यता वाढविली आहे. श्रीमंदिराला पेशवेकालीन भव्य तटबंदी असून त्यात प्रशस्त ओवऱ्या निर्माण करण्यात आल्या आहेत.
भगवान श्रीचिंतामणींची मूर्ती भव्य, पूर्वाभिमुख व डाव्या सोंडेची आहे. मूर्ती मांडी घालून बसलेल्या अवस्थेत आहे. श्रीमंदिराचे मुख्य प्रवेशद्वार उत्तरमुखी असून श्री चिंतामणीचा विग्रह पूर्वाभिमुखी आहे. देवालयाचा महादरवाजा उत्तरेकडे तोंड करून आहे. मुख्य मंदिराच्या बाहेर तीन बाजूंना तीन कोनाड्यात तीन छोट्या मूर्ती आहेत. उत्तर दिशेला दक्षिणमुखी हनुमान स्थापित आहेत. श्रीचिंतामणीच्या पाठीशी पश्चिमेला असणाऱ्या गणेशांना लंबोदर गणेश अशी संज्ञा आहे. श्री मुद्गलपुराणात पश्चिम दिशेची देवता म्हणून श्री लम्बोदरांचे वर्णन आहे. तर उत्तर दिशेला उत्तरेश्वर नावाच्या गणेशाची स्थापना केली आहे. मंदिरात प्रवेश करताच लक्ष वेधून घेणाऱ्या विशाल दीपमाला दिमाखात उभ्या आहेत. श्री चिमाजीअप्पा यांनी वसईच्या विजयाच्या वेळी पोर्तुगीजांकडून हस्तगत केलेली विशाल घंटा श्रीचिंतामणींच्या प्रांगणाचे एक विशेष आकर्षण आहे. ज्या स्थानी कपिल महर्षींनी श्री चिंतामणींना त्यांचे चिंतामणी रत्न परत केले. त्या स्थानी कदंब वृक्ष नावाने आजही भव्य वृक्ष पाहायला मिळतो.
श्रीचिंतामणीच्या मंदिराच्या परिसरातच श्रीविष्णुलक्ष्मी मंदिर, श्रीमहादेव मंदिर, श्रीदक्षिणमुखी हनुमान मंदिर इ. अन्य मंदिर समुदाय आहे. महादरवाजापासून नदीपर्यंत दगडी सडक पेशव्यांनी बांधली आहे. थेऊर गांवाला तीन्ही बाजूंनी मुळामुठा नदीचा वेढा आहे. येथें नदीला बाराही महिने पाणी असतें. नदीच्या डोहाला ‘कदंबतीर्थ’ किंवा ‘चिंतामणी तीर्थ ‘ असें म्हणतात. असलेले अलीकडेच येथे श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच तैलचित्र प्राकारांत एका ओवरीत बसविण्यांत आले आहे.
यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मागील बाजूस श्रीचिंतामणीचे माता पिता ‘माधव व सुमेधादेवी’ यांची मंदिरे आहेत. त्याच्या जवळच खडकेश्वर हे शंकराचे मंदिर आहे. त्याच परिसरात कालिका मंदिर व भैरवनाथाचे मंदिर आहे. पश्चिमेकडे नदीच्या काठावर रमाबाईसाहेब या आपले पती श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या सह सती गेल्या, त्यांचे स्मारक आहे. रमाबाई पेशवे स्मारकाचे चिंचवड देवस्थानाने जीर्णोद्धार केलेला आहे. श्रीचिंतामणी मंदिराच्या नैऋत्य दिशेला कौंडिण्य ऋषिंचा आश्रम असलेले स्थान अंदाजे १ कि. मी. अंतरावर आहे.
© 2024 Chinchwad Deosthan Trust : Theur. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper