अष्ट विनायकांपै एक अशा या स्थानास कशामुळे महत्त्व प्राप्त झाले यासंबंधींच्या पुराणांत तीन कथा आहेत :
(१) प्रजापति श्री ब्रह्मदेवांच्या चित्तात चंचलता (थर्व) उत्पन्न झाल्यामुळे त्यांची परमेश्वरनिर्मित सृजनाची शक्ति कमी झाली. म्हणून त्यांनी चित्तस्थिरतेकरितां विघ्ननाशन श्रीगणेशाचे एकाग्र होऊन तपानुष्ठान केलें, तेव्हां त्यांच्या चित्ताची चंचलता नष्ट होऊन ते शांत व स्थिर झाले. ज्या स्थानीं त्यांना ही सिद्धि प्राप्त झाली तेथें त्या प्रसंगाचें स्मारक म्हणून श्री ब्रह्मदेवांनी त्या स्थानाला चित्तस्थैर्याची शीघ्र सिद्धि देणारे ‘स्थावर क्षेत्र’ असे नांव दिले व चित्तवृत्तीत प्रकाश पाडणाऱ्या श्री चिंतामणींची तेथे स्थापना केली.
(२) अभिजित व गुणवती या राजदांपत्याला ब्रह्मप्रसादानें अपत्य झाले व त्याचें नांव ‘गण’ ठेवण्यांत आलें. पण तो दैत्यासारखा तापदायक निघाला. कपिलमुनींनी आपल्या जवळ असलेल्या ‘चिंतामणी रत्नाच्या’ सामर्थ्याने या गणराजाला एकदां भोजन दिले. तेव्हां त्या रत्नाची अभिलाषा धरून त्यानें तें मुनींकडून हिरावून घेतले. कपिल मुनींनी श्रीविनायकाची आराधना केल्यानंतर विनायकानें या दैत्याशीं युद्ध करून त्याचा संहार केला व ते रत्न मुनींना परत केलें, पण मुनींनी ते घेतले नाहीं. तेव्हां देवानें ‘चिंतामणी’ हेंच नांव धारण करून ज्या वृक्षाखाली ही घटना घडली तेथें कायमचें वास्तव्य केले. तें हें कदंब तीर्थ.
(३) ऋपिपत्नी अहल्येशी कपटाचरण करून निंद्य कर्म केल्याबद्दल गौतम मुनींनी इंद्राला ‘सर्वांगाला क्षतें पडतील’ असा शाप दिला, तेव्हां इंद्राने ऋषींचे पाय धरून क्षमा मागितली. ऋषींनी मग त्याला श्रीगणेशाची षडाक्षरी मंत्रानें तपःपृत होऊन आराधना करून शापाच्या परिणामांतून मुक्त होण्याचा मार्ग दाखवून दिला. इंद्रानें ज्या स्थानीं ही तपश्चर्या करून शुद्धि व मुक्ति मिळविली आणि तो चिंतामुक्त झाला त्या स्थानी श्रीगणेशाची स्थापना करून तिथल्या सरोवराला चिंतामणि असें नांव दिले.
येथें अनुष्ठान करणाऱ्या साधकाच्या चित्ताला शांति आणि स्थिरता प्राप्त होते असा या क्षेत्राचा महिमा आहे.