क्षेत्रमाहात्म्य

श्री मोरया गोसावी महाराज तपश्चर्या स्थान

          श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज त्यांच्या गुरूंच्या म्हणजेच श्रीनयनभारती गोसावींच्या आज्ञेनुसार थेऊर येथे गेले. त्या ग्रामस्थांनी सांगितलेला क्षेत्रमहिमा ऐकून मोरया गोसावींना आनंद झाला. श्रीचिंतामणीचे दर्शन घेऊन गुरुंच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी तपश्चर्येला सुरुवात केली. तपासाठी त्यांनी जेथे कोणाचाही उपद्रव होणार नाही अशी एकांतातील जागा शोधली. आजही ती जागा “मोरयाचे आसन” म्हणून प्रसिद्ध आहे.  त्या ठिकाणी थंडी, वारा, ऊन, पाऊस या कशाचीही पर्वा न करता श्री मोरया गोसावी महाराजांनी समाधी लावली. ती अन्नपाण्याविरहित समाधी अवस्था बेचाळीस दिवस दृढ होती व त्या तपश्चर्येच्या काळातच कसोटीचा एक क्षण आला. 

          जंगलातून एक वाघ आला. मोरया गोसावींना पाहून त्याने त्यांना खाण्याकरता त्यांच्यावर झडप घातली. झडप घालण्यापूर्वी त्याने भयंकर गर्जना केली. त्या आवाजाने मोरया गोसावींनी किंचित् डोळे उघडले व त्या वाघाकडे पाहिले. वाघाने त्यांच्या अंगावर झडप घातली. पण मोरया गोसावींची दृष्टी पडताच तो वाघ शिळारूप झाला. श्री मोरया गोसावी महाराजांना मात्र वाघ शिळारूप झाल्याची कल्पनाही नव्हती. डोळे मिटून ते पुन्हा समाधी अवस्थेत गेले. अजूनही तो पाषाण झालेला वाघ थेऊरला पहायला मिळतो.

          बेचाळीस दिवसांच्या समाधी नंतर मात्र त्या क्षेत्राची अधिष्ठात्री देवता ‘श्रीचिंतामणी’ प्रसन्न झाली. त्यांनी श्रीमोरया गोसावींना प्रत्यक्ष दर्शन दिले. त्यांना समाधीतून जागे करून ते म्हणाले, “आता तू अशा प्रकारे घोर तप करू नकोस. तुझ्या तपश्चर्येने मी संतुष्ट झालो आहे. तुझ्या तपाचे फळ म्हणून मी स्वेच्छेने तुझ्या पोटी जन्म घेईन. तू गृहस्थाश्रमाचा स्वीकर कर. सर्वाभूती भगवद्भाव ठेवून स्वधर्माचे पालन कर.” श्री चिंतामणींची ही आज्ञा ऐकून मोरया गोसावी काळजीत पडले. ते म्हणाले, “देवा, मला या संसाराच्या मायापाशात गुंतवू नका. इतकी वर्षे पालन केलेले ब्रह्मचर्यव्रत मी कसे मोडू? प्रपंचात अडकल्यामुळे तुमच्या भक्तीला मी अंतरेन. तुम्ही मला या मोहात गुंतवू नका.” 

          श्रीचिंतामणी म्हणाले, “मोरया, तू मोहपाशात अडकणार नाहीस. केवळ मला तुझ्या पोटी जन्म घ्यायचा आहे म्हणून तू गृहस्थाश्रम स्वीकार कर.” मोरया गोसावी म्हणाले, “देवा, आपली आज्ञा आहे म्हणून मी गृहस्थाश्रम स्वीकारतो. पण आपण माझ्या घरी जन्माला आलात हे मी कसे ओळखावे ? त्याची प्रचीती काय ? आपण एखादी खूण मला सांगावी.” श्रीचिंतामणी म्हणाले, “माझ्या जन्माची खूण म्हणजे मी जन्म घेते वेळी खेचरी मुद्रा लावीन. इतर मुले रडतात, त्याप्रमाणे मी रडणार नाही. माझ्या हृदयावर पंज्याप्रमाणे शेंदूराचा पट्टा उमटेल. तू आता परत मोरगावी जा. तेथे तुला तथाकाल जो प्रसाद मिळेल तो मत्स्वरूपच समज.” असे म्हणून श्रीचिंतामणी गुप्त झाले.

श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराजांचे सुपुत्र श्रीचिंतामणी महाराज देव हे साक्षात् थेऊरच्या श्रीचिंतामणीचे अवतार होते.

theur-leave-img-divider
मराठी english